पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डनसमोर घडली.
सुभाष बन्सी ओव्हाळ (वय ४२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताप्रकरणी अजय सुभाष ओव्हाळ (वय २३, रा. साने चौक, चिखली) यांनी सोमवारी (दि. ६) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो ट्रक चालक संतोष सुभाष दळगडे (वय ४५, सध्या रा. टॉवर लाईन, चिखली; मूळ रा. धाराशिव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील सुभाष ओव्हाळ हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 डीजी 7264) थरमॅक्स चौकाकडून बर्ड व्हॅलीकडे जात होते.
त्यावेळी आरोपी चालकाने आपला टेम्पो ट्रक (एमएच 04 एफयु 6655) वेगाने आणि निष्काळजीपणे पाठीमागे घेऊन दुचाकीला जोरात धडक दिली.
ट्रक अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन सुभाष ओव्हाळ यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
