पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad) – एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीची गोपनीय माहिती आणि कच्च्या मालाचे फोटो चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ एप्रिल २०२५ ते १० एप्रिल २०२५ दरम्यान घडली.
सागर रोहिदास कानवडे (वय ३२, रा. डुडुळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. ८) याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील देवीदास कुटे (वय ३२, रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखील हा पॅक टाइम कंपनीत एक्झिक्यूटिव्ह ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने कंपनीतील कर्मचारी नामदेव शेलार यांना कॉल करून मटेरियल मध्ये इशू झाला असून मटेरियल डिटेल्सची माहिती हवी असल्याचे सांगितले. त्यातून त्याने परचेस विभागाच्या ईमेल मधील माहितीचा फोटो आणि मटेरियलचा फोटो मागवला. तो फोटो त्याने स्वतःकडे ठेवला. दरम्यान त्याने कंपनी मधून काम सोडून प्रतिस्पर्धी कंपनी व्होरेन फार्मा उत्तर प्रदेश येथे नोकरी सुरू केली. फिर्यादी यांच्या कंपनीतून प्राप्त केलेले फोटो त्याने अप्रमाणिकपणे प्रतिस्पर्धी कंपनी व्होरेन फार्मा कंपनीला दिले. हे फोटो त्याने जर्मनी येथील एम एल प्लास्टिक कंपनीला पाठवून फिर्यादी यांच्या कंपनी प्रमाणे समान कच्च्या मटेरियलची मागणी करत फसवणूक केली. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
