चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे ओळखीच्या व्यक्तीने एका मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (१ एप्रिल) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.
या प्रकरणी रेवण केरबा कावळे (४५, रामनगर, चिंचवड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जनार्धन तुकाराम पांचाळ (५२, नाणेकरवाडी, खेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेवण हे कंपनीतून घरी जात असताना आरोपीने पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. आरोपीने “मी पारधी आहे, तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत वारंवार हल्ला केला. या झटापटीत फिर्यादीच्या मनगटावर आणि बरगडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.
नागरिक मदतीला धावले असता आरोपीने त्यांनाही कोयता उगारून धमकावले, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दक्षिण चाकण पोलीस तपास करत आहेत.
