पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – बांधकाम व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पाच लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान हिंजवडी चौक येथे घडली.
या प्रकरणी अनिकेत संजीव कुमार अग्रवाल (वय ३५, रा. भोसलेनगर, गणेश खिंड, पुणे) यांनी सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दीपक कोंडीबा फडके (रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना चार कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यासाठी बाणेर येथील एका फ्लॅटचा समझोता करारनामा करून त्याची मूळ प्रत आणि आगाऊ सुरक्षा ठेव म्हणून पाच लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, कर्ज न मिळवून देता ही रक्कम परत न करता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
