pimpri chinchwad-शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ७५ लाखांची फसवणूक

(pimpri chinchwad)-ताथवडे परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ७५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत भुमकर चौक, ताथवडे येथे घडली.

या प्रकरणात एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल क्रमांकधारक दिव्या, प्रोफेसर सुनील जैन, दोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे ॲडमिन व विविध बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका नामांकित सिक्युरिटीज कंपनीचे सल्लागार असल्याचे भासवले. त्यांची कंपनी सेबी रजिस्टर आहे असे सांगून फिर्यादीला शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील केले. तिथे विविध आयपीओ आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. सेबी आणि नामांकित कंपन्यांचे बनावट शिक्के असलेले लेटर दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला व त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले.

फिर्यादीने ७५ लाख ५० हजार रुपये भरल्यानंतर आरोपींनी ती रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *