पिंपरी, दि. २९(pimpri chinchwad crime ) – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आणि सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची पाच लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी येथील ‘योगिराज असोसिएट’ कार्यालयात २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.
शांताराम मारुती शिर्के (वय ५४, रा. येरंडवणा, पुणे) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ पठारे (वय ४०) आणि शुभम पाटील (वय ३०, दोन्ही रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेतले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज मंजुरीसाठी बँकेच्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी रोख आणि बँक खात्याद्वारे रक्कम उकळली.
मात्र, कोणतेही कर्ज मंजूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
