(Pimpri chinchwad crime)-खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याचा राग धरून एका ग्राहकाने हॉटेलच्या मॅनेजरला गाडीच्या चावीने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उडपी लंच होम, खराळवाडी येथे घडली.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर राघवेंद्र सीताराम शेट्टी (४५, खराळवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत सकपाळ (२७, खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत सकपाळ याने सुरुवातीला हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ केली.
त्यानंतर मॅनेजर शेट्टी यांनी त्याला जेवणाचे बिल मागितले असता, आरोपीने रागाच्या भरात आपल्या जवळील अॅक्टिव्हा गाडीची चावी शेट्टी यांच्या मानेवर आणि डोक्यावर मारली. यामध्ये शेट्टी जखमी झाले आहेत. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
