पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad crime) – थट्टा-मस्करीमध्ये ‘काळ्या’ असे संबोधल्याचा राग मनात धरून एका तरुणाने हातगाडी चालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना चिखली येथील जाधववाडी परिसरात बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
बबरुवान सुभाष सुर्यवंशी (वय ३८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी गुरुवारी (दि. ९ एप्रिल) रोजी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी मंगेश ज्ञानेश्वर मांडगे (वय २२, रा. जाधववाडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दालचा राईसची हातगाडी चालवतात. आरोपी हा त्यांचा नियमित ग्राहक आहे.
फिर्यादीने त्याला थट्टा-मस्करीमध्ये ‘काळ्या’ अशी हाक मारली. याचा राग आल्याने आरोपीने जवळ असलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
