(pimpri chinchwad)-दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी येलवाडी गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या बाजूला असलेल्या पत्राशेडच्या मागे सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र खेडकर यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अभिषेक हरिश्वर स्वामी (२१, देहू), खैरुल रामुतुल्ला मोडल (३४, महाळुंगे इंगळे) आणि आलोक बापू थोरात (२५, देहूगाव) यांना ताब्यात घेऊन नोटीस दिली आहे, तर मुख्य आरोपी सागर रंगदाळ याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर रंगदाळ याच्या सांगण्यावरून इतर तीन आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार चालवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ हजार ४८० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे.
दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
