पिंपरी, दि. ४(pimpri chinchwad) – पिंपळे सौदागर येथील सेव्हन प्लुमेरिया ड्राइव्ह सोसायटीसमोरील नव्याने करण्यात आलेला रस्ता अवघ्या आठ दिवसांत खचला आहे. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नुकतेच पूर्ण झालेल्या या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, मार्च अखेर निधी खर्च करण्याच्या घाईत कामे उरकली जात असल्याने दर्जा घसरत आहे.
कामे घाईगडबडीत पूर्ण करून बिले काढण्याच्या पद्धतीमुळेच अशा निकृष्ट दर्जाच्या कामांना चालना मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याशिवाय, स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
कररूपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सदर निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच काम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
