मुंबई : घाटकोपरमधील एका खासगी गृहनिर्माण सोसायटीतून सुरू झालेला ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद आता मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या सोसायटी परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीला विरोध केल्यानंतर त्यांना सामाजिक बहिष्कार, धमक्या आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याने वादाला नवे राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे.
प्रसाद वेदपाठक यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांच्या सोसायटीच्या परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीबाबत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर चांगलाच गाजला. वेदपाठक यांनी या पट्टीचा संबंध भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी जोडत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात सोसायटीतील काही सदस्य आक्रमक झाल्याचा आरोप करण्यात आला.
वेदपाठक यांनी दावा केला की, पांढऱ्या पट्टीला विरोध केल्यानंतर त्यांना सोसायटीमध्ये वाळीत टाकण्यात आले. काही अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून कुटुंबीयांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर प्रसाद वेदपाठक यांनी काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची पुन्हा भेट घेऊन संपूर्ण घडामोडींची माहिती दिली. या भेटीनंतर मनसेने वेदपाठक यांना पाठिंबा देत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “एखाद्या नागरिकाने आपले मत मांडले म्हणून त्याला धमक्या देणे किंवा सामाजिक बहिष्कार टाकणे योग्य नाही. प्रसाद वेदपाठक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना न्याय मिळाला पाहिजे.”
देशपांडे यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मतभेद असू शकतात, पण त्यासाठी धमक्या देणे किंवा दडपशाही करणे लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा आता भाषिक ओळख, स्थानिक अस्मिता आणि सांस्कृतिक प्रतीकांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर या विषयावर समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला असून विविध राजकीय पक्षही या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत.
आता हा विषय थेट मनसेच्या दरबारात पोहोचल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात मनसे या विषयावर अधिक आक्रमक भूमिका घेणार का, तसेच प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या प्रकरणात कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रसाद वेदपाठक यांना मिळणाऱ्या कथित धमक्यांची चौकशी व्हावी आणि त्यांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एका सोसायटीतून सुरू झालेला हा वाद आता राज्यस्तरीय चर्चेचा विषय बनला आहे.
