Pimpri-Chinchwad ‘पाणी वाचवा, शहर वाचवा’; पिंपरी-चिंचवडकरांना आयुक्तांचे भावनिक आवाहन

एल-निनोमुळे पावसाला विलंब; वाहन धुणे, स्विमिंग पूल भरणे टाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग कार्यान्वित ठेवा

पिंपरी-चिंचवड :
एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन लांबल्याने पिंपरी-चिंचवड शहरासमोर संभाव्य पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. “पाणी बचत ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरवासीयांना सजग होण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील जलसाठ्यांवर वाढता ताण आणि पावसाचा अनिश्चित कालावधी लक्षात घेता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी बचतीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी वाहन धुण्यासाठी नळाचे पाणी वापरणे टाळावे. व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांनी पुनर्वापरित पाण्याचा वापर करावा. तसेच खासगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये नवीन पाणी भरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गळती रोखा; पाणी वाचवा
घरातील नळ, फ्लश टँक, पाईपलाईन आणि जलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक घर आणि आस्थापनात एरेटर्स बसवून पाण्याचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कमी पाण्यात अधिक कार्यक्षमतेने काम करणारी उपकरणे वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगची तातडीने तपासणी करा
महापालिकेने शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि उद्योगांना त्यांच्या परिसरातील रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा तपासण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाचे पाणी भूगर्भात मुरविण्यासाठी आवश्यक साफसफाई, दुरुस्ती आणि देखभाल तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा
रस्ते, पदपथ, आवार किंवा वाहनांची अनावश्यक धुलाई, बागांना अतिरिक्त पाणी देणे, ओव्हरहेड टाक्यांमधून पाणी वाहून जाणे अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. नागरिकांनी आणि सोसायट्यांनी यावर नियंत्रण ठेवावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘आजची बचत उद्याचे संरक्षण’
महापौर रवी लांडगे यांनी पाणी हा भावी पिढ्यांसाठीचा अमूल्य ठेवा असल्याचे सांगितले. “पाणी जपा, पाणी वाचवा आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमात सहभागी व्हा. प्रत्येक थेंब वाचवला तरच भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल,” असे त्यांनी म्हटले.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे आणि कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांनीही नागरिकांना पाण्याचा पुनर्वापर वाढविण्याचे आणि जलसंवर्धनाची सवय अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनी आजच पाणी बचतीचा संकल्प केला, तर उद्याची संभाव्य पाणीटंचाई टाळणे शक्य होईल. प्रशासनाने इशारा दिला आहे, आता जबाबदारी नागरिकांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *