विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान; 6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी

मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांपैकी 11 जागांसाठी आज मतदान होत असून, 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानापूर्वीच सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीतील चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. महायुतीने या सहा जागा बिनविरोध जिंकत राजकीय आघाडी घेतली असून उर्वरित 11 जागांवर आज चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

दरम्यान, ठाणे येथून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

उर्वरित जागांवरील निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वसंतराव देशमुख यांच्यात सामना आहे. नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे आमनेसामने आहेत. तर अमरावतीमध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

नाशिक मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचे नाव माघारीनंतरही मतपत्रिकेवर कायम असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकदीचे चित्र स्पष्ट होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही या निवडणुकीकडे महत्त्वाचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *