pimpri chinchwad crime-प्रियकराच्या मदतीने पतीला बेदम चोपले; व्हिडिओही बनवला

पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला घरी बोलावून दारू पाजली. त्यानंतर रबरी पाइप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास घडली. तसेच प्रियकर पतीला मारत असल्‍याचा व्‍हिडिओ देखील आपल्‍या मोबाइलमध्‍ये तयार केला.

अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. मु. केळवडे, ता. भोर, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या पतीचे नाव असून त्‍यांनी मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे (वय ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नीने फिर्यादी पती अमोल यांना शनिवारी दुपारी आपल्‍या भोसरीतील घरी बोलावून घेतले होते. तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे यांनी फिर्यादीला दारू पाजली. त्यानंतर किरकोळ वादावरून दोघांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

अजय नात्रे पाइपने मारहाण करत असताना आरोपी पत्नीने पतीचा ओरडतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. या मारहाणीत अमोल यांच्या मान, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. भोसरी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *