मुंबई : राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईनंतर पनीर आणि खव्याचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. अवघ्या काही दिवसांत पनीरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ झाली असून, पूर्वी 240 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे पनीर आता 350 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
FDA ने निकृष्ट आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर अनेक पुरवठादारांनी मालाचा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये पनीर आणि खव्याचा पुरवठा घटला आहे. परिणामी किरकोळ बाजारात दर झपाट्याने वाढले आहेत.
या दरवाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई व्यावसायिकांना बसत आहे. पनीरवर आधारित पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांना वाढीव दराने माल खरेदी करावा लागत असून, काही ठिकाणी पनीर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.
दुग्धजन्य पदार्थांवरील कारवाईमागे ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा उद्देश असला, तरी त्यातून निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे बाजारात महागाईचे संकट वाढले आहे. पुरवठा पूर्ववत झाल्यानंतरच पनीर आणि खव्याच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
