ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात दहा हजारांचा दंड; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध मोटार वाहन न्यायालयाने कठोर भूमिका घेत १५ दिवसांचा साधा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे बेदरकार वाहनचालकांना चांगलाच धडा मिळाला आहे.
नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर ३१ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक ३४ वर्षीय व्यक्ती मद्याच्या नशेत वाहन (एमएच १४ एफएम १३४२) चालवत असताना अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आला होता. त्यावेळी भोसरी वाहतूक विभागाने संबंधितावर कारवाई करत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात पार पडली. न्यायालयाने वैद्यकीय चाचणीचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरत संबंधित चालकाला दोषी ठरवले. न्यायालयाने मोटार वाहन कायद्यानुसार १५ दिवसांचा साधा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त १० दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे.
याशिवाय बेदरकार वाहन चालविल्याबद्दल स्वतंत्रपणे ३ हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला असून तो न भरल्यास ५ दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे.
या निर्णयानंतर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे केवळ स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले. तसेच या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
