पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – दुकानाची चावी नसल्याने सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तीन तरुणांनी एका दुकानदाराला बेदम मारहाण केली. तसेच दुकानदारावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना चिंचवड येथील लिंक रोडवर गुरुवारी (दि. २ एप्रिल) रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली.
आदित्य उर्फ लाल्या किसन जाधव (वय ३२) आणि अजित उर्फ मत्री रामा पवार (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर उदल उर्फ चिकन्या हरिचंद वाल्मिकी (वय ४०, सर्व रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) हा मुख्य आरोपी असून त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. विकास अरुण झिंजाडे (वय ३२, रा. पत्रा शेड, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. २) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास यांचे ‘करीष्मा प्रोव्हिजन स्टोअर्स’ नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास तिन्ही आरोपी तिथे आले आणि सिगारेट मागितली. विकास यांनी दुकानाची चावी जवळ नसल्याचे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत सुरूवातीला हाताने मारहाण केली. आरोपी उदल वाल्मिकी याने आपल्याकडील लोखंडी कोयत्याने विकास यांच्या पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
पुढील तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक घुगरे करीत आहेत.
—
