अमरावती (Amravati)-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हर्षजीत देशमुख यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशमुख यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना थेट निवडणुकीच्या मैदानात उतरून जनतेचा कौल घेण्याचे आव्हान दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “उल्टा चोर कोतवाल को डांटे. जर तुम्ही तयार असाल तर फिल्डमध्ये उद्या या आणि सुरुवात करा. निवडणुकीला अवघे चार-पाच दिवस राहिले आहेत. हॉस्पिटलमध्ये राहून कशासाठी नाटक करता?”
देशमुख यांच्या वक्तव्यांवर निशाणा साधताना ठाकूर म्हणाल्या, “हर्षजीत देशमुख यांचे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल, असेच आहे. ही चीड येण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते नेमकी कोणाची भूमिका मांडत आहेत, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.”
यावेळी त्यांनी डिजिटल माध्यमातून सुरू असलेल्या प्रचारावरही टीका केली. “त्यांच्यात दम असेल तर त्यांनी तयारीपूर्वक यावे आणि निवडणूक लढवावी. डिजिटल माध्यमातून प्रचार हा एक बालिशपणा आहे. निवडणूक ही सोशल मीडियावर नव्हे तर जनतेच्या न्यायालयात लढवायची असते. मतदारांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची तयारी असली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात या वक्तव्याची भर पडली असून हर्षजीत देशमुख यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना विविध पक्षांतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत यशोमती ठाकूर यांनी केलेल्या या टीकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
