पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका वेअर हाऊसमध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवत मासिक खंडणीची मागणी करणाऱ्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विजयनगर दिघी येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
सोहेल अलिशेर मिर्झा (वय २३, रा. म्हस्के वस्ती, कळस, विश्रांतवाडी, पुणे) आणि साकीर हुसेन आषिश चिट्टपरम (वय २३, रा. घुलेनगर, मांजरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हर्षद अरुण आहेर (वय २५, रा. खराडी, पुणे) यांनी बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी यासंदर्भात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपींनी ‘इन्स्टाकार्ट सर्व्हिस’च्या वेअर हाऊसमध्ये शिरून गोंधळ घातला. “कंपनी चालू ठेवायची असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर एकेकाला कापून टाकीन, आम्ही दिघीचे भाई आहोत” अशी धमकी दिली. तसेच त्यांनी तेथील गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली.
दिघी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
