पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विक्रमी ४३९९ दिवसांच्या कार्यकाळानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण; भाजप अल्पसंख्यांक मोर्चाकडून दुवा पठण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४३९९ दिवस देशाचे नेतृत्व करत नवा विक्रम प्रस्थापित केला असून केंद्रातील मोदी सरकारलाही १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यावर विशेष चादर अर्पण करण्यात आली. यावेळी देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक सौहार्दासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले.

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे नेते अबिद अली आणि यासीन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडला. अजमेर शरीफ दर्ग्यावर पारंपरिक पद्धतीने चादर अर्पण करून देशाच्या विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या विक्रमी कार्यकाळाचे औचित्य साधून अजमेर शरीफ येथे प्रार्थना करण्यात आली.

अबिद अली यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासिक ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळावे आणि देश प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे जावा, यासाठी आम्ही अजमेर शरीफ येथे दुवा मागितला आहे.”

आबिद अली यासीन चौधरी यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राने देशातील सर्व समाजघटकांना जोडण्याचे काम झाले आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.”

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध योजनांचा उल्लेख केला. तसेच विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अजमेर शरीफ दर्ग्यावर झालेल्या या विशेष कार्यक्रमात भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी करण्यात आलेल्या दुवा पठणामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *