घरात एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेची हत्या; दागिने सुरक्षित, कौटुंबिक व मालमत्ता वादाच्या दिशेने तपास
पिंपरी-चिंचवड :
शहरातील चऱ्होली बुद्रुक परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळताच काळजेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली.
शकुंतला काळूराम गिलबिले (वय ७५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ते सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एकटेपणाचा गैरफायदा?
शकुंतला गिलबिले या काळजेवाडी येथील राहत्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. मुलगाही काही काळापूर्वी दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता. त्यामुळे घरात त्या एकट्याच असत. आरोपीने याच परिस्थितीचा फायदा घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सायंकाळी उघडकीस आला थरार
मंगळवारी सायंकाळी घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर घरात पाहणी केली असता शकुंतला गिलबिले यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. माहिती मिळताच दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू केला.
दागिने सुरक्षित; चोरीचा हेतू संशयाबाहेर
घटनास्थळाच्या पाहणीत मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे आढळले. घरातील वस्तूही विस्कटलेल्या नव्हत्या. त्यामुळे केवळ चोरीसाठी हा खून झाल्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांचे प्राथमिक निरीक्षण आहे. मालमत्तेचा वाद, वैयक्तिक कारणे किंवा कौटुंबिक मतभेद या अंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही तपासात सहभागी झाली आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने आणि पुरावे संकलित केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. नातेवाईक, शेजारी आणि परिचितांची चौकशी सुरू आहे.
चऱ्होलीत भीतीचे वातावरण
भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे चऱ्होली आणि परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके युद्धपातळीवर तपास करत आहेत.
