शिवसेना राजकारणात मोठी घडामोड? ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा; दिल्लीत हालचालींना वेग

नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांनी मंगळवारी रात्री लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपले निवेदन सादर केले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास या गटाच्या भूमिकेला मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घडामोडींना राजकीय वर्तुळात “ऑपरेशन टायगर” असे नाव दिले जात आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक तसेच कायदेविषयक सल्लागारांची टीम उपस्थित होती. या बैठकीत संभाव्य कायदेशीर अडचणी, पक्षांतरविरोधी कायदा आणि खासदारांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दाव्यानुसार, सहा खासदार आता अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. तसेच शिवसेनेच्या आगामी वर्धापन दिन कार्यक्रमात हे खासदार शिंदे गटाच्या मंचावर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर अद्याप दोन्ही गटांकडून अधिकृत आणि स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या वृत्ताला अंतिम पुष्टी मिळालेली नाही, असेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

या घडामोडींमुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याची चर्चा सुरू असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *