ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे गटाची धाकधूक वाढली; आता आमदारांवर नजर, 20 आमदारांबाबत राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर आता ठाकरे गटातील आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांनी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. येत्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात हे सर्व खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या घडामोडींमुळे ठाकरे गटाची संसदेतील ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे मानले जात आहे. परिणामी आता पक्षातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे. “खासदारांचा विषय सोडा, मुंबईतील 65 नगरसेवक तुमच्याकडे राहतात का ते बघा,” असे वक्तव्य करून त्यांनी ठाकरे गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता.

राजकीय विश्लेषकांच्या मते, खासदारांनंतर आता आमदारांवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. ठाकरे गटाकडे सध्या असलेल्या 20 आमदारांबाबत विविध चर्चा सुरू असून आगामी काळात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ठाकरे गटातील चर्चेत असलेले आमदार पुढीलप्रमाणे आहेत :

मेहकरचे सिद्धार्थ खरात, दर्यापूरचे गजानन लवाटे, बाळापूरचे नितीन देशमुख, वणीचे संजय देरकर, परभणीचे राहुल पाटील, विक्रोळीचे सुनील राऊत, जोगेश्वरी पूर्वचे अनंत (बाळा) नर, दिंडोशीचे सुनील प्रभू, वर्सोव्याचे हरुन खान, कलिनाचे संजय पोतनीस, वांद्रे पूर्वचे वरुण सरदेसाई, माहीमचे महेश सावंत, वरळीचे आदित्य ठाकरे, शिवडीचे अजय चौधरी, भायखळ्याचे मनोज जामसूतकर, खेड-आळंदीचे बाबाजी काळे, उमरग्याचे प्रवीण स्वामी, धाराशिवचे कैलास पाटील, बार्शीचे दिलीप सोपल आणि गुहागरचे भास्कर जाधव.

मात्र या सर्व चर्चांदरम्यान ठाकरे गटाकडून कोणत्याही संभाव्य फुटीचे संकेत नाकारले जात आहेत. पक्षातील नेते सातत्याने पक्ष एकसंध असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असे संकेत देत आहेत.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून 19 जूननंतर राज्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *