Dharashiv-पवनराजे हत्याकांड निकालानंतर अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया; “सत्याचा आणि न्यायाचा विजय”

धाराशिव : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत अर्चना पाटील यांनी हा सत्याचा आणि न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांपासून पाटील कुटुंबीयांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवला होता. अखेर न्यायालयाने सर्व पुरावे, साक्षी आणि घटनाक्रमाचा सखोल अभ्यास करून हा निर्णय दिल्याने सत्य समोर आले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पाटील कुटुंबाला अनेक प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांना सामोरे जावे लागले. सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठा संघर्ष सहन करावा लागला. मात्र कोणत्याही परिस्थितीत न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढळू दिला नाही, असेही अर्चना पाटील यांनी नमूद केले.

न्यायालयाचा निर्णय हा कोणाच्याही विजय-पराजयाचा विषय नसून न्यायप्रक्रियेचा सन्मान करण्याचा क्षण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनी न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा, असे आवाहन केले. तसेच या प्रकरणावरून राजकारण करण्याऐवजी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, दोन दशकांहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या या बहुचर्चित प्रकरणातील निकालामुळे धाराशिवसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *