नवी दिल्ली(delhi) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘टीबी मुक्त भारत अभियान’ संदर्भात उच्चस्तरीय आभासी आढावा बैठक घेतली. यावेळी देशाला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्दिष्टासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डिसेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या गतीमान ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत आतापर्यंत देशभरात २८ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच सुमारे २० लाख नागरिकांना टीबी प्रतिबंधक उपचार देण्यात आले असून ५.७ लाख नवीन ‘निक्षय मित्र’ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २४ मार्च २०२६ पासून देशभरातील १.२ लाखांहून अधिक उच्च जोखीम असलेल्या गावे, शहरी वॉर्ड आणि सामूहिक वस्त्यांचा समावेश करण्यात आला. या भागांमध्ये १.७ लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून टीबी शोध, निदान आणि उपचार प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
क्षयरोग निर्मूलनासाठी सुरू असलेल्या या राष्ट्रीय मोहिमेत युवकांचाही मोठा सहभाग दिसून आला आहे. देशभरातील १.९ लाखांहून अधिक ‘माय भारत’ स्वयंसेवक या अभियानात सहभागी झाले असून जनजागृती, तपासणी आणि रुग्ण सहाय्य कार्यात योगदान देत आहेत.
बैठकीत जे. पी. नड्डा यांनी टीबी निर्मूलनासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तसेच वेळेवर निदान, उपचार आणि जनजागृतीच्या माध्यमातून भारताला टीबीमुक्त करण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
भारताने क्षयरोग निर्मूलनासाठी हाती घेतलेले हे व्यापक अभियान जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांपैकी एक मानले जात असून, आगामी काळात या मोहिमेला आणखी गती देण्यावर भर दिला जाणार आहे.
