Mumbai-मालाड सबवेची महापौर रितू तावडे यांच्याकडून पाहणी; जलनिस्सारण व्यवस्थेचा घेतला आढावा

मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर महापौर रितू तावडे यांनी आज मालाड सबवे परिसराला प्रत्यक्ष भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात सबवेमध्ये पाणी साचून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उभारण्यात आलेल्या हाय-कॅपॅसिटी पम्प्स तसेच जलनिस्सारण व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात पी पश्चिम प्रभाग समितीचे अध्यक्ष हैदर अली शेख, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक योगेश वर्मा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा, नगरसेविका योगिता कोळी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौरांनी अधिकाऱ्यांना सबवेमधील पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा २४ तास कार्यरत आणि सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच पाणी साचल्यास तात्काळ पर्यायी यंत्रणा सक्रिय करून वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत राहावा यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे रितू तावडे यांनी यावेळी सांगितले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महापालिका यंत्रणा सतत कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *