Pimpri-Chinchwad-ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका; JCB ने केबल तोडल्याने प्राधिकरण परिसर ७ तासांपासून अंधारात!

पिंपरी-चिंचवड :
हरित सेतूच्या (Green Bridge) फुटपाथचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका प्राधिकरणवासीयांना बसला आहे. कॅम्प एज्युकेशन शाळेसमोर काम सुरू असताना, एका JCB चालकाने निष्काळजीपणे खोदाई करून महावितरणची २२ KV बजाज फिडरची मुख्य उच्चदाब केबल तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर दुर्घटनेमुळे परिसरातील विद्युत पुरवठा गेल्या ७ तासांपासून पूर्णपणे खंडित झाला असून, नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​’या’ भागांतील बत्ती गुल!
​केबल तुटल्यामुळे खालील प्रमुख परिसरांतील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे:
​सेक्टर २७ अ
​संत तुकाराम गार्डन परिसर
​डी. वाय. पाटील जंगल कॉलेज रस्ता
​वेस्टर्न कॉलनी

​नागरिकांमध्ये तीव्र संताप
​उन्हाचा तडाखा आणि त्यातच गेल्या ७ तासांपासून वीज नसल्याने घरातील पाण्याचे पंप, इन्व्हर्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली आहेत. “विकासकामांचे स्वागत आहे, पण काम करताना महावितरणच्या भूमिगत केबल्सचा नकाशा किंवा काळजी का घेतली जात नाही?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यातच रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

​”JCB चालकाने बेजबाबदारपणे खोदाई केल्यामुळे ही मुख्य केबल तुटली आहे. अत्यंत उच्च दाबाची (२२ KV) केबल असल्याने दुरुस्तीच्या कामाला मोठा वेळ लागत आहे. महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून, लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
– महावितरण अधिकारी

ठेकेदारांवर कारवाई होणार का?
​शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या नावाखाली अशा प्रकारे सरकारी मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. या निष्काळजीपणामुळे हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, संबंधित बेजबाबदार ठेकेदारावर महावितरण आणि पालिका प्रशासन कडक कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *