विधानभवनात शरद पवार–एकनाथ शिंदे यांची अनपेक्षित भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले, ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित भेटीमुळे. विधानभवनात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी विधानभवनात दाखल झाले होते. संबंधित बैठक पार पडल्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. मात्र, शरद पवार भेटीसाठी आल्याची माहिती मिळताच त्यांनी कॅबिनेट बैठक काही काळासाठी सोडून आपल्या दालनात येत पवार यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या चर्चेचा नेमका विषय काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

राज्यात सध्या अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी सुरू आहेत. पावसाळी अधिवेशन, विविध विकास प्रकल्प, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच राज्यातील बदलते राजकीय समीकरण या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या प्रत्येक भेटीला आणि हालचालींना विशेष महत्त्व असते. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक सोडून ही भेट घेतल्याने या चर्चेला अधिकच रंग चढला आहे.

दरम्यान, या भेटीनंतर कोणत्याही नेत्याने माध्यमांसमोर चर्चा उघड केली नसल्याने भेटीमागील नेमके कारण अद्याप गूढच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या भेटीवरून नव्या राजकीय घडामोडी घडतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *