Mumbai-‘पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं’; खडसे-तावडे भेटीवर गुलाबराव पाटलांची फटकेबाजी
प्रतिनिधी | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया देत खडसेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
गुलाबराव पाटील म्हणाले, “पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं. राजकारणात प्रत्येक गोष्टीला वेळ, परिस्थिती आणि जनतेचा कौल महत्त्वाचा असतो.” त्यांनी पुढे सांगितले की, अफवा आणि चर्चांवर राजकारण होत असले तरी अंतिम निर्णय संबंधित नेतेच घेतात. मात्र, वारंवार पक्ष बदलण्याच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी सूचक टीकाही त्यांनी केली.
विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर तसेच खडसेंनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी अद्याप कोणत्याही पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.