पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)-पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी या घटनेवर तीव्र भाष्य केले आहे. कचऱ्याच्या डोंगरालगत इमारत उभारण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अशा प्रकारचे नियोजन हे अत्यंत चुकीचे आणि धोकादायक असल्याचे म्हटले.
बारणे म्हणाले की, हजारो टन कचऱ्याच्या साठ्याच्या शेजारी इमारत उभारणे हा प्रशासनाचा गंभीर नियोजनाचा दोष आहे. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची इमारत किंवा प्रकल्प उभारण्यापूर्वी सुरक्षिततेचे सर्व निकष तपासणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज ही भीषण दुर्घटना घडली असून अनेक कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरील तीन मजली इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने अनेक कामगार अडकले होते. बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले असून उर्वरित कामगारांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरातील सर्व प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही श्रीरंग बारणे यांनी केली.
