मुंबई | प्रतिनिधी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा करत नवीन चर्चांना तोंड फोडले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात बदली होईल आणि त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांनी केला.
यावेळी बोलताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असेही वक्तव्य केले. राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये भविष्यात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या दाव्यांवर भाजप किंवा महायुतीतील इतर नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राऊत यांच्या या विधानामुळे आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
