नाशिकमध्ये उमेदवार देऊ न शकणाऱ्या संजय राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा प्रहार

महाविकास आघाडी राज्यातील 16 महापालिकांमध्ये निवडणूक लढविण्याची भाषा करत असताना नाशिकची जबाबदारी असलेले संजय राऊत यांनी तिथे निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात पक्षाचा उमेदवार देऊ न शकणाऱ्या राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. संजय राऊत हात लावतात तिथे राजकीय कोळसा होतो हे माहीत झाल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राऊत यांना बाजूला सारत आहेत, असेही श्री. बन म्हणाले.

नाशिकमध्ये उमेदवारी न देण्यामागे कोणता घोडेबाजार किंवा व्यवहार झाला का, याचे उत्तर राऊतांनी जनतेसमोर द्यावे, असे म्हणत श्री. बन यांनी शेतकरी प्रश्नावरूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे मिळाला नाही. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम ठाकरे सरकारने केले. मात्र महायुती सरकारने कोणतीही निवडणूक नसताना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे काम केले. फसव्या योजना भाजपा किंवा महायुतीच्या नसून त्या ठाकरे आणि राऊत यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या. महायुती शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील आणि सर्व 17 जागांवर विजय मिळवतील, असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच विधान परिषद निवडणूक समन्वयाने लढण्याचा निर्णय महायुतीकडून घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींचा पाठिंबा महायुतीला मिळत असल्यामुळे या निवडणुकीतही निश्चितच मोठे यश मिळेल, असे श्री. बन यांनी ठणकावून सांगितले.
विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या काँग्रेसच्या कारकिर्दीत झाल्या असल्याचे सांगत काँग्रेसला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केले असून फसवाफसवी हा काँग्रेसचा जुना राजकीय धंदा असल्याची टीका श्री. बन यांनी केली. महायुती सरकार शेतकरीहिताचे निर्णय घेत असून काँग्रेसने आधी आपल्या कारकिर्दीचा हिशेब द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *