मुंबई : मुंबईतील वाढता उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिकांचे हाल होत असून, त्यातूनच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक नागरिक रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर झोपलेले दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा किनारपट्टीलगतच्या झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये राहणारे अनेक रहिवासी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडून समुद्रकिनाऱ्यावर झोपण्यास प्राधान्य देत आहेत. घरांमध्ये पुरेशी हवा खेळती नसल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे राहणे कठीण होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे काहीसा दिलासा मिळत असल्याने अनेक कुटुंबे सूर्यास्तानंतर किनाऱ्यावर येतात आणि रात्रभर तेथेच विश्रांती घेतात. पहाट होताच ही मंडळी पुन्हा आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करतात.
मुंबईत यंदा उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः झोपडपट्ट्या आणि कमी सुविधा असलेल्या वस्त्यांमधील नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरत आहे.
