पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला ३७ लाख २५ हजार ७४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरील जाहिरातीच्या माध्यमातून हा सायबर फसवणुक करण्यात आली.
याप्रकरणी एका पुरुष फिर्यादीने मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीन, ‘निलम धवन’ नावाची महिला आणि काही बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ जानेवारी २०२६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवर ‘अॅक्सिस सिक्युरिटीज’च्या नावाने जाहिरात दिसली होती. त्यावर क्लिक केल्यावर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामावून घेण्यात आले.
तिथे साप्ताहिक ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. निलम धवन नावाच्या महिलेने विश्वास संपादन करून फिर्यादींना एका लिंकवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादींनी टप्प्याटप्प्याने ३७ लाख रुपये भरले. त्यांच्या खात्यावर १ कोटी ८१ लाख रुपयांचा नफा दिसत होता, मात्र ती रक्कम काढण्यासाठी (विड्रॉल) पुन्हा कमिशन आणि टॅक्सच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली.
सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
