pimpri chinchwad -म्हातोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; हिंजवडी-वाकड परिसरात निर्बंध

सुमारे ५० हजार भाविकांची अपेक्षित गर्दी; दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत अनेक मार्ग बंद

पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – हिंजवडी येथील ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या यात्रेनिमित्त २ एप्रिल रोजी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान होणाऱ्या पारंपरिक बगाड मिरवणुकीमुळे हिंजवडी ते वाकड मार्गावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी विविध रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

दुपारी ३ वाजता निघणाऱ्या बगाड मिरवणुकीत सुमारे ४० ते ५० हजार भाविक सहभागी होणार असल्याने टाटा टी चौक, वाकड नाका, जॉमेट्रीक सर्कल, शिवाजी चौक, भुमकर चौक आदी प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच पिंपळे गुरव येथेही गाययात्रा मिरवणुकीमुळे सांगवी परिसरातील काही मार्गांवर निर्बंध राहणार आहेत.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ ते रात्री १० या कालावधीत अत्यावश्यक सेवा व मिरवणुकीतील वाहने वगळता सर्वसामान्य वाहनांना संबंधित मार्गांवर प्रवेश बंद राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत टाटा टी चौक ते वाकड नाका, जॉमेट्रीक सर्कल ते वाकड नाका, शिवाजी चौक ते भुमकर चौक तसेच इंडियन ऑईल चौक परिसरातील अनेक मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे. यासाठी लक्ष्मी चौक, भूमकर चौक, शिवाजी चौक, वाकडगाव मार्ग आदी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

वाकड परिसरातही कस्पटे चौक, मानकर चौक, वाकडगाव चौक, कस्पटे कॉर्नर, दत्तमंदिर रोड आणि सयाजी अंडरपास परिसरातील मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा, म्हातोबा चौक आणि पिंक सिटी रोड या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तसेच सांगवी वाहतूक विभागांतर्गत दत्त मंदिर चौक ते पिंपळे गुरव कमान या मार्गावर वाहतुकीस बंदी घालण्यात आली असून, वाहनधारकांनी बँक ऑफ महाराष्ट्र मार्गे शिवगणेश चौकाचा पर्याय निवडावा.
यात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी आणि मिरवणुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही अधिसूचना लागू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संयम राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *