पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad crime) – गाडी व्यवस्थित चालवण्याबाबत हटकल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराने एका टेम्पो चालकाला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १ एप्रिल) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणी नगर येथे घडली.
याप्रकरणी रितेशकुमार संतोष राम (वय २२, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बबलु इस्माईल शेख (वय ४१, रा. बालाजीनगर, भोसरी) असे जखमी टेम्पो चालकाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. २) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबलू शेख हे बुधवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास आपला ‘छोटा हत्ती’ टेम्पो घेऊन जात असताना आरोपी रितेशकुमार समोरून भरधाव वेगाने आला. फिर्यादीने त्याला “गाडी दमाने चालव” असे म्हटले. याचा राग येऊन आरोपीने दुचाकी थांबवली आणि फिर्यादीला शिवीगाळ केली.
त्यानंतर टेम्पोतीलच लोखंडी पाईप काढून त्याने फिर्यादीच्या डोक्यात जोराने प्रहार केला, ज्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शेलार करीत आहेत.
