पिंपरी, दि. २८(pimpri chinchwad crime) – बसमधून कोणीतरी बाहेर थुंकले ते दुचाकीस्वाराच्या अंगावर उडाले. याचा राग मनात धरून एका तरुणाला बसमधून खाली खेचून चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली आहे.
या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रसाद तुकाराम टेके (वय २१, रा. बालाजी नगर, चाकण, मूळ गाव- कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २७) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील हजारे आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रसाद टेके हे कंपनीची दुसरी शिफ्ट संपवून बसने घरी जात होते. निघोजे गावाच्या हद्दीत एल.एम.टी. कंपनीसमोर बस आली असता, बसमधून कोणीतरी रस्त्यावर थुंकले. हे थुंकणे रस्त्यावरून मोटारसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडले.
याचा राग आल्याने मोटारसायकलवरील आरोपींनी बस अडवली आणि “बसमधून बाहेर कोण थुंकले?” अशी विचारणा केली.
त्यावेळी बसच्या बोनेटवर बसलेले फिर्यादी उभे राहिले असता, आरोपींनी त्यांना खाली बोलावले. खाली उतरल्यानंतर फिर्यादीच्या ओळखीचा असलेला आरोपी स्वप्नील हजारे आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना हाताने व पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
एका आरोपीने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रहार केला, ज्यामध्ये फिर्यादीचे डोके फुटले असून त्यांच्या डोळ्याला आणि गालाला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
