पिंपरी, — शालेय शिक्षण विभागाने ‘एक पेड माँ के नाम ३.०’ अभियानांतर्गत प्रत्येक शाळेला किमान ५० रोपे लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या शहरात वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे लावलेल्या रोपांची किमान तीन वर्षे काळजी घेण्याची जबाबदारी कोण घेणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक शाळांची जागा मर्यादित आहे. काही शाळांच्या आवारात खेळाचे मैदानही नाही. अनेक ठिकाणी इमारती, पार्किंग आणि इतर सुविधांमुळे मोकळी जागा उरलेली नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेने ५० रोपे नेमकी कुठे लावायची, हा प्रश्न शिक्षण क्षेत्रात उपस्थित होत आहे.
दरवर्षी विविध मोहिमांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. छायाचित्रेही काढली जातात. मात्र काही महिन्यांनंतर या रोपांचे अस्तित्वच दिसत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे असल्याचे पर्यावरणप्रेमी वारंवार सांगत आले आहेत.
एका रोपाला नियमित पाणी, संरक्षक जाळी, खत आणि देखभालीची आवश्यकता असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये त्याची काळजी घ्यावी लागते. साधारण तीन वर्षांनंतरच रोप स्वतःच्या बळावर वाढण्यास सक्षम होते. त्यामुळे केवळ रोपे लावून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे समजणे चुकीचे ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
शहरातील अनेक शाळा महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे या रोपांच्या संगोपनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार का, नियमित पाहणी होणार का आणि जिवंत राहिलेल्या रोपांची नोंद ठेवली जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी मोहीम राबविली गेली तर तिचा पर्यावरणाला फारसा लाभ होणार नाही, अशीही चर्चा आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यकच आहे. मात्र त्यासाठी जागेचे नियोजन, रोपांची योग्य निवड आणि दीर्घकालीन देखभाल याकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे “५० रोपे लावा” या आदेशापलीकडे जाऊन “५० रोपे जगवा” हा संकल्प प्रत्यक्षात राबविला गेला तरच या मोहिमेला खऱ्या अर्थाने यश मिळेल. अन्यथा दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपणाच्या आकड्यांची चर्चा होईल आणि काही महिन्यांतच बहुतेक रोपे नामशेष होतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
रोपे लावणे सोपे; पण तीन वर्षे जगविणार कोण? शाळांना ५० झाडांचे लक्ष्य; पिंपरी-चिंचवडमध्ये जागेचा प्रश्न अन् संगोपनाचे मोठे आव्हान
