पिंपरी, दि. २७ (pimpri chinchwad crime) – चिखलीतील चिंचेचा मळा परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून साठा केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २५ मार्च )रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रोहित प्रभाकर शिंदे (वय २७, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विरोधी पथकातील पोलीस अंमलदार समीर लक्ष्मण रासकर यांनी गुरुवारी (दि. २६) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपीने कोणतीही सुरक्षितता न पाळता घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये गॅस काढून साठा केला होता. यावेळी १३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गॅस सिलिंडरच्या रिकाम्या व भरलेल्या टाक्या, वजन काटा जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास चिखली पोलीस करत आहेत.
