सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त
चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी एकूण दोन लाख ९५ हजार रुपये किमतीची पाच वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
राज संतोष बापर्डेकर (२३, ताम्हाणेवस्ती, चिखली), शंकरसिंग समंदरसिंग टाक (१८, गाडीतळ, हपडसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राज बापर्डेकर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. तर शंकरसिंग टाक हा देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर झाडपसर, मांजरी, येरवडा, निगडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या चार गुन्ह्यांमध्ये फरार होता. चिखली पोलीस तपास करीत आहेत.