शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
पुणे :
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली. मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, शतक महोत्सवी साहित्य संमेलन जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, डॉ. स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर, सुनील महाजन आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
सामंत म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाची शंभर वर्षांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख आहे. यापूर्वी नवी दिल्ली आणि सातारा येथील साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. आगामी काळात युवा साहित्य संमेलन, ९९ वे साहित्य संमेलन, परदेशातील १२ साहित्य संमेलने तसेच मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यावर्षीपासून भारतीय व जागतिक साहित्याचे मराठीत भाषांतर करण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ‘अनुवाद समिती’ स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र निधी दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच ‘अभिजात सप्ताह’ निमित्त राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये ‘माझी मराठी, अभिजात मराठी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बळकटीकरणासाठी राज्य मराठी विकास संस्थेमार्फत एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत लवकरच बैठक होणार असून मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी शासनाचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.