पिंपरी, दि. २९(pimpri chinchwad crime) – जुन्या भांडणाच्या रागातून नेहरुनगर परिसरात दगडफेक करून लोकांच्या घरांच्या काचा फोडणाऱ्या आणि कोयत्याने दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार मयुर पंडित चौगले यांनी शनिवारी (दि. २७ मार्च) रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी स्वप्नील सतीश जोगदंड (वय १९) आणि कपिल मिलिंद जोगदंड (वय २३, दोन्ही रा. विठ्ठलनगर, नेहरुनगर) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास आरोपींनी सिद्धार्थ गवळी (वय २१) याच्यावर दगडफेक करून परिसरात दहशत माजवली होती.
डायल ११२ वरून माहिती मिळताच मार्शल पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपी स्वप्नील याच्याकडे धारदार कोयता मिळून आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.
