(pimpri chinchwad)-थेरगाव येथील जगतापनगर भागात महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत अनधिकृत माती भराव टाकून नाल्याचा प्रवाह रोखल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२५ पासून १ एप्रिल २०२६ दरम्यान जगतापनगर येथे घडली.
या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता पंकज सुधाकर धेंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम ओव्हाळ आणि सारिका जगताप (दोघेही थेरगाव गावठाण) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना मोकळ्या जागेत अनधिकृत भराव थांबवण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आली होती, तरीही त्यांनी काम सुरूच ठेवले. या भरावामुळे परिसरातील नाल्यात माती जाऊन नाला अरुंद झाला असून, यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
