पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची १५ लाख ९१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन परिसरातील घडली.
याप्रकरणी किर्ताना बंगेरा नावाची महिला आणि विविध बँक खातेधार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवड स्टेशन येथील प्रशांत रेसीडन्सीमधील एका महिलेने गुरुवारी (दि. २ एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २२ सप्टेंबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड स्टेशन येथील प्रशांत रेसीडन्सीमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला फेसबुकवर शेअर मार्केट संदर्भात एक लिंक दिसली होती.
ती ओपन केल्यानंतर त्यांना ‘संमको एफर्टलेस ट्रेडिंग’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले.
आरोपींनी फिर्यादीला ऑनलाईन शेअर्स खरेदी-विक्री करण्यास सांगून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १५ लाख ९१ हजार ५० रुपये भरण्यास भाग पाडले.
गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे करीत आहेत.
