पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad) – गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने बंडलमध्ये केवळ तीन खऱ्या नोटा आणि बाकी खेळण्यातील नोटा ठेवून एका तरुणाची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी सकाळी पाच वाजता माणिक चौक, चाकण ते शिक्रापूर रोडच्या कडेला घडली.
हुजेब फिरोज बागवान (वय २६, रा. यादगार सिटी, इंदापूर रोड, ता. बारामती, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. ५) उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश ज्ञानदेव ढाकरे (वय २१) आणि समीर दिनकर म्हल्ले (वय २६, दोघेही रा. शेलगाव, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीची आल्टो गाडी ३ लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले.
विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी ३ लाख रुपये लगेच देतो आणि उरलेले ५० हजार गाडी नावावर झाल्यावर देतो असे सांगितले. गाडीची पूजा करायची आहे असे म्हणून ते घाईत गाडी घेऊन निघून गेले. फिर्यादीने पैशांचे बंडल तपासले असता, त्यात वरच्या आणि खालच्या मिळून केवळ ३ नोटा खऱ्या होत्या आणि मधल्या सर्व नोटा खेळण्यातील होत्या.
उत्तर चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
