पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad crime) – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे जमीन विक्रीच्या वादातून कुटुंबाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांकडून २० लाख रुपयांचा चेक आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली.
नंदकुमार दत्तात्रय गाडे (वय ४३, रा. सदुंबरे, मावळ) यांनी गुरुवारी (दि. ९ एप्रिल) रोजी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विठठल खंडू गाडे (वय ४७), बाळकृष्ण खंडू गाडे (वय ५२), ओंकार गाडे (वय २४), सार्थक गाडे (वय २०) आणि इतर ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी आरोपी बाळकृष्ण गाडे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय दुय्यम निबंधक कार्यालयासमोर असताना आरोपींनी त्यांना जमीन विक्रीवरून धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना जबरदस्तीने गाडीत बसवून कातवी रोडवर नेले. तिथे त्यांना पट्ट्याने मारहाण करून जखमी केले व “तुमचा मुळशी पॅटर्न करतो” अशी धमकी दिली. तसेच वडिलांकडून २० लाख रुपयांचा चेक आणि २ हजार रुपये रोख हिसकावून घेतले.
तळेगाव दाभाडे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
