पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – नेहरुनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नेहरुनगर येथील पवार पेट्रोल पंपाशेजारील बालाजी ट्रेडर्ससमोर घडली.
दानिश आरिफ शेख (वय १८, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहाबाज उर्फ टिपू शहा (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी), इर्रशाद शहा (वय ३२, रा. भोसरी), सूरज उर्फ आसिफ शेख (वय २१, रा. नेहरुनगर, पिंपरी) आणि रामा दुर्गाअप्पा चौधरी (वय २५, रा. नेहरुनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या दाजींना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीला पकडून धरले, तर दुसऱ्याने “इसको अब खत्म कर देंगे” असे म्हणत रस्त्याकडेला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या चेहऱ्यावर जोराने मारला. यामध्ये फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूरज आणि रामा या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
सिमेंटच्या गट्टूने प्रहार करत तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न
