​लंडन ट्रिपच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक एअर इंडियाचे ‘फेक’ तिकीट देऊन गंडा

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्या एका नागरिकाला लंडन ट्रिपच्या नावाखाली एक लाख ६४ हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार मोशी प्राधिकरणात उघडकीस आला आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून विमान तिकिटांचे पैसे उकळले, मात्र प्रत्यक्षात एअर इंडियाच्या वेबसाईटवर पेमेंट न करता फसवणूक केली. ही घटना १५ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली.
​डेनिस पटेल (वय अंदाजे ४६, रा. रक्षक नगर, खराडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. दुर्गेश परशुराम चव्हाण (वय ४६, धंदा-नोकरी, रा. हृदय रेसिडेन्सी, मोशी प्राधीकरण) असे फसवणूक झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डेनिस पटेल याने फिर्यादी दुर्गेश चव्हाण यांना लंडन ट्रिपबाबत वेगवेगळ्या ऑफर्सचे आमीष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याने ७ मे २०२६ रोजीच्या मुंबई ते लंडन प्रवासासाठी एअर इंडियाच्या तीन तिकिटांचे बुकिंग करण्याच्या बहाण्याने १ लाख ६४ हजार ७०० रुपये घेतले. मात्र, त्याने एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर कोणतेही पेमेंट न करता फिर्यादीला ‘नॉन कन्फर्म’ तिकिटे देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खडसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *