८१ वर्षीय पित्याच्या सतर्कतेने वाचले १२ लाख ‘डिजिटल अरेस्ट’चा डाव पोलिसांनी उधळला!

पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – मुंबई पोलीस क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला आणि त्याच्या पत्नीला तब्बल २४ तास ‘डिजिटल अरेस्ट’ करून १२ लाख रुपयांना गंडा घालण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. ८१ वर्षीय पित्याच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या दांपत्याची मोठी आर्थिक फसवणूक टळली आहे.
​रविवारी १९ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास निगडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरील व्यक्तीने “तुमच्या नावाचे पार्सल पकडले असून त्यात ५ पासपोर्ट आणि एम.डी. ड्रग्ज सापडले आहे,” असे सांगून भीती घातली. त्यानंतर ‘सिग्नल’ अॅप डाऊनलोड करायला लावून व्हिडिओ कॉलद्वारे या दांपत्याला २४ तास नजरकैदेत (डिजिटल अरेस्ट) ठेवले. “वरिष्ठांची चौकशी संपेपर्यंत कॅमेरासमोरून हलायचे नाही,” अशी धमकी या तोतया पोलीस अधिकाऱ्याने दिली होती.
​घाबरलेल्या तरुणाकडून सायबर चोरट्यांनी बँक खात्याची आणि आधार कार्डची माहिती घेतली. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. त्यासाठी पीडित तरुणाने आपल्या म्युच्युअल फंडातून १२,००,००० रुपये काढण्याची विनंतीही केली होती. ही रक्कम खात्यात येताच ती गुन्हेगारांच्या हवाली केली जाणार होती.
​वृद्ध पित्याचा ‘मास्टरस्ट्रोक’
​गुन्हेगारांपासून नजर चुकवून पीडित तरुणाने ही माहिती आपल्या ८१ वर्षीय वडिलांना दिली. वडिलांनी कोणताही वेळ न घालवता सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार सोपान बोधवड यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून सोपान बोधवड, मुकुंद वारे आणि महिला पोलीस अंमलदार स्नेहा म्हस्के यांनी तात्काळ पीडिताच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी त्या दांपत्याची समजूत काढून हा सर्व प्रकार ‘डिजिटल अरेस्ट’ची फसवणूक असल्याचे पटवून दिले.
​जनजागृतीचा सकारात्मक परिणाम
​पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सोसायट्यांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. याच जनजागृतीमुळे या प्रकाराला वेळीच रोखता आले, अशी भावना व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी लक्षात ठेवावे की ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही संकल्पना कायद्यात नाही. कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलवर चौकशी करून पैसे मागत नाही. अशा वेळी घाबरू नका. तात्काळ ११२ वर किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

​सायबर फसवणूक टाळण्यासाठी हे करा
– ​अनोळखी व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नका.
– ​बँक खाते किंवा आधारची माहिती कोणालाही देऊ नका.
​- फसवणूक झाल्यास ‘१९३०’ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *