भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग ​६ बंबांच्या साहाय्याने आगीवर मिळवले नियंत्रण

पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहतीचा भाग असलेल्या भोसरी एमआयडीसीमध्ये सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी पहाटे आगीची घटना घडली. टी-ब्लॉक मधील एका कंपनीत लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अल्पावधीत आटोक्‍यात आणली.
​सोमवारी, पहाटे ५:२४ च्या सुमारास टी-ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीतून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ​घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अत्यंत तत्परता दाखवली. मुख्य केंद्रासह उपकेंद्रांतील एकूण सहा अग्निशमन वाहने (बंब) तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. अवघ्या काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
आग शेजारील इतर कंपन्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात अग्‍निशामक दलास यश आले. या घटनेत कंपनीचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
​कंपनीत आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *